दापोली:- दापोली तालुक्यातील कोंढे तेलीवाडी येथे गुरुवारी 21 जुलै रोजी दुपारी 12 वा. च्या सुमारास गोठयामध्ये बिबटया मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. नेमका बिबटया झोपला आहे की जिवंत आहे या भीतीपोटी ग्रामस्थ पुढे जाण्याच घाबरत होते.
येथील राजू कदम हे आपल्या बकर्या चरवून घरी नेत असताना वाटेवर असलेल्या शरद पवार यांच्या गोठयातून घाण वास येवू लागला. म्हणून त्यांनी गोठयाचे दार उघडून आत पाहिले असता बिबटया असल्याचे दिसले. बिबटयाला पाहून ते पुरते घाबरले. त्यांनी लगेचच याबाबतची माहिती गावकर्यांना दिली. बघता बघता गावभर बातमी पसरली. सारे गावकरी गोठयाच्या दिशेने धावले. गोठयात जावून खरचं बिबटया मृतावस्थेत आहे का याची खात्री केली. खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली. परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, वनपाल सावंत, वनरक्षक शुभांगी भिलारे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन सोपस्कार केले.