दापोली:- दापोली शहरातील कोकंबा आळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दापोलीतील कोकंबा आळी येथे राहणाऱ्या एक ३२ वर्षीय महिला रस्त्याने आपल्या घरी जात होत्या. त्याच वेळी अचानक एका कोल्ह्याने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या पायाला कडाडून चावा घेतला. जखमी अवस्थेत या महिलेला तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटने पाठोपाठ याच परिसरात आणखी दोघांवर कोल्ह्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रविण गणपत राठोड (वय वर्षे सुमारे २६) आणि सुरेश काशीराम गोरीवले वय वर्ष सुमारे 64यांचा समावेश आहे. कोल्ह्याने या दोघांच्याही पायाला चावा घेतला. या दोघांनीही तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते.
शहराच्या वस्तीत येऊन कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला केल्यामुळे कोकंबा आळी व दापोली परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे धोकादायक ठरत असल्याने वनविभागाने या मोकाट जनावराचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.









