दापोलीत कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू

दापोली:- तालुक्यातील तेरे वांगणी येथील रहिवासी असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा कामावर जात असताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी, २७ जानेवारी रोजी घडली. शर्मिला शंकर खांबे असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यांच्या आकस्मित निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला खांबे या उदरनिर्वाहासाठी दापोली बस स्थानकासमोरील शिंदे हॉटेलमध्ये कामाला होत्या.

नेहमीप्रमाणे त्या कामावर जात असताना कोंडा येथील रस्त्यावर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्या चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांचे पुत्र महेश खांबे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.