दापोलीत अवैध शिकार प्रकरणी चौघांना अटक; रायफलसह 15 जिवंत काडतुसे जप्त

रत्नागिरी:- दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची अवैध शिकार करण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 12 बोर रायफल व 15 जिवंत काडतुसे आणि टोयोटा क्वालिस वाहन असा एकूण 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अक्षय बळिराम नागळकर (रा. घोडबंदर रोड, भाईंदर ठाणे, योगेश विठ्ठल तुरे (रा. टाळसुरे, दापोली), सचिन कचेर पाटील, (रा. दापोडे भिवंडी, ठाणे ),करण उर्फ बंटी शिवाजी ठाकूर (रा. भिवंडी ठाकराचा पाडा, ठाणे ) अशी अटक करण्यात आलेल्या 4 जणांची नावे आहेत.

18 जून रोजी मध्यरात्री 12.वा पासून ते सकाळी 5.वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑल आउट ऑपरेशन” राबविण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार, हॉटेल्स, लॉज, संशयित वाहने इत्यादि रत्नागिरी पोलीसांमार्फत चेक करण्यात आली.

या दरम्यानेच, खेड उपविभागामध्ये नाकाबंदी तपासणी व गस्त घालत असताना दापोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये वन्यजीव प्राण्यांची अवैध शिकार करणारी टोळी वाहनासहीत फिरत असल्याची गोपनीय माहिती खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली.
माहिती मिळताच राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक पोलीस पथक तयार करण्यात आले. ज्यामध्ये दोन पंचांचा देखील समावेश करण्यात आला होता.

या पथकाद्वारे दापोली येथील जंगलमय भागात गस्त घालण्यात आली व रात्री 3.वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा घेत वेगाने पुढे जाताना आढळून आली ज्याच्या टपावर दोन इसम बसलेले दिसले व त्यामधील एका इसम आपल्या हातात 12 बोर रायफल घेऊन बसला होता. पथकाद्वारे या संशयित वाहनास जागीच थांबविण्यात आले व दोन पंचांसमक्ष वाहनाची झडती घेण्यात आली. झडती दरम्याने गाडीमध्ये इतर 2 इसम व बारा बोरची 15 जिवंत काडतुसे मिळून आली.

गुन्ह्यातील मिळून आलेल्या व त्यांच्याकडून 1 बारा बोर बनावटीची रायफल, 15 जिवंत काडतुसे व एक , असा एकूण 3 लाख 3 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 101/2023 भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम 3(२५) अन्वये या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर, पोलीस उपनिरीक्षक गंगधर, दापोली पोलीस ठाणे,चालक पोहेकॉ एम. एच. केतकर, पोकॉ विनय पाटील, खेड पोलीस ठाणे यांनी केली.