दापोलीतून दोन अवैध बंदुकांसह एकाला अटक

दापोली:- अवैधरित्या बंदूक बाळगल्याच्या आरोपावरून दापोली येथील  विनेश विश्राम बर्जे, याला पोलिसांनी ताब्यात घेतले  याच्याकडील सिंगल बॅरेल असलेल्या २ अवैध बंदुका हस्तगत करण्यात आल्या आहेत. दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.

शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी खेर्डी, पानवाडी, ता. दापोली येथे इसम विनेश विश्राम बर्जे, वय ४० वर्षे, रा. खेर्डी, पानवाडी हा त्याचे घराचे शेजारी बंदुकीची साफसफाई करताना मिळून आला. त्याचे ताब्यात सिंगल बॅरेल असलेल्या ०२ अवैध बंदुका मिळून आल्या. सदर दोन्ही बंदुकांची किंमत सुमारे रु. ५०,०००  आहे. सदर बाबत पोह. विजय आंबेकर, नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोफौ रविंद्र बुरटे नेमणुक दापोली पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदर कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोउनि संदीप वांगणेकर, पो. हवालदार मिलींद कदम, विजय आंबेकर, बाळु पालकर आणि चापोना दत्ताराम कांबळे यांनी सहभाग घेतला.