दापोली:- शहरातील बसस्थानकात असणाऱ्या श्री दत्त मंदिरात दानपेटी फोडून चोरी करणारा ओम ढमढेरे (रा. तळेगाव पुणे) हा अट्टल चोरटा दापोली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
दापोलीत सलग ३ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झाली होती. मौजे दापोली बुरोंडी व श्री दत्त मंदिर या चोरीचा तपास करत असताना पोलीस ठाण्याचे राजेंद्र नलावडे यांच्याकडे तपास आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पो. निरीक्षक तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ढमढेरेला पोलिसांनी शिताफीने अटक केली. ढमढेरे याने काही मंदिरातील दानपेट्या फोडून पैसे लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे. पाजपंढरी येथील मंदिर व राधाकृष्ण मंदिरातही चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी ढमढेरेवर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याच्याकडून चोरीची रक्कम काही प्रमाणात हस्तगत केली. ढमढेरेला दापोली न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.









