रत्नागिरी:-ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दांडेआडम येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार करण्याचे अड्डे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत शहर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये काळा गुळ , नवसागर, साखर असा एकूण ९ लाखाचे साहित्य व ५ लाखांचा टेम्पो शहर पोलीसांनी जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
या प्रकरणी पोलीसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गावठी दारुची निर्मिती होत आहे हे जप्त केलेल्या मुद्देमालावरुन स्पष्ट होत आहे. दांडेआडम येथे एका गोदामावर शहर पोलीसांनी छापा टाकून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर पोलीसांना या मुद्देमालाची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीसांनी हा छापा टाकून जप्त केलेला मुद्देमाल ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.कोल्हापूर येथून हे साहित्य आणण्यात आले आहे. अन्य कोठे हा गुळ दारू बनवण्यासाठी दिला आहे का ? याचा शोध पोलीस घेतीलच. व अन्य कुठे विकला का हे सर्व तपासात उघड होणार आहे.