दमामेत बिबट्याकडून पाच बकऱ्यांची शिकार

दापोली:- दापोली तालुक्यातील दमामे गावातील वडाचीवाडी येथील शेतकरी सुभाष अंबाजी हरावडे यांच्या वाड्यातील पाच बकऱ्या बिबट्याने ठार केल्या. एक बकरी तो घेऊन गेला. शुक्रवारी (ता. १०) घडलेल्या या घटनेने दमामे गावाबरोबरच परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

यापूर्वी शिवाजीनगर येथील कामतकोडं येथे बिबट्याने दोन वर्षांची पाडी ठार केली होती. तसेच गावतळे येथील चरावयास गेलेल्या वासराला पकडले होते, परंतु ते निसटल्यामुळे वाचले. आता दामामे येथे पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.