रत्नागिरी:- पत्नीला मारहाणप्रकरणी पोलीस पतीसह तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरती नीलेश भागवत (३७, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) असे तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे नाव आहे. २०१८ पासून पती आपल्याला सातत्याने मारहाण करत असून नणंद व एक अल्पवयीन मुलगी यांनीही मारहाण केल्याचे आरती हिने तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
नीलेश सुरेश भागवत (४२, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी), दिक्षिता दिलीप यादव (रा. लांजा) व अल्पवयीन मुलगी या तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दाखल तक्रारीनुसार, आरती व नीलेश यांचे ३० मे २०१५ रोजी लग्न झाले. नीलेश हा पोलीस असून सध्या त्याची नेमणूक रत्नागिरी जयगड सागरी पोलीस ठाणे येथे आहे. २०१८ पासून नीलेश याच्या स्वभावामध्ये बदल होत गेला. मैत्रिणींशी सातत्याने त्याचे बोलणे होत असे, याबाबत त्याला विचारणा केली असता आपल्याला तो मारहाण करायचा. असा आरोप आरती हिने केला आहे. यानंतर १५ सप्टेंबर २०२५ रोजी नीलेश याने आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गळा दाबण्याचा प्रयत्न केला तसेच माझे डोके भिंतीवर आपटून दुखापत केली. यावेळी आपण आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता नणंद दिक्षिता व एक अल्पवयीन मुलगी यांनीही आपल्याला हाताच्या थापटाने मारहाण केली. असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.