नागरिकांनी संशयिताला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन
रत्नागिरी:- शहरातील ऐतिहासिक थिबापॅलेस परिसरात मंगळवारी सकाळी एका मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. परिसरातील सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून संशयिताला रंगेहात पकडल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी थिबापॅलेस परिसरात बहुरूपी कलाकाराचा वेश परिधान केलेला एक मुलगा वावरत होता. यादरम्यान एका अनोळखी तरुणाने त्या मुलाला फुस लावून जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहरण होत असल्याचे लक्षात येताच मुलाने तात्काळ आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित तरुणाला वेढून जागीच पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला व तत्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात संशयित आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये हा तरुण मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो रत्नागिरीत नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता आणि त्याने अपहरणाचा प्रयत्न का केला, याचा सखोल तपास शहर पोलीस करत आहेत. उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.









