चिपळूण:- थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. आरोपीने बांबूच्या काठीने कर्मचाऱ्याच्या डोक्यावर हल्ला केला, ज्यात तो कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक लक्ष्मण पवार (वय ३७) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, ते गांधी नगर, बहादूर शेख नाका येथे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, साजिद ए. रज्जाक मुकादम आणि वफा साजिद मुकादम या दोघांवर भारतीय दंड संहिता कायद्यानुसार कलम ३५२, ३५१(२), ३२४, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पेठमाप, मुकादम मोहल्ला येथील सालीहा मंझील, दुसऱ्या मजल्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पवार हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी अंकुश घाटाळ यांच्या आदेशानुसार थकबाकी वसुलीसाठी मुकादम मोहल्ला येथील साजिद मुकादम यांच्या घरी गेले होते. त्यावेळी, घरात असलेल्या वफा मुकादम यांना त्यांनी थकीत बिल भरले नसल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर, पवार यांनी इमारतीच्या गेटजवळ असलेल्या मीटर कनेक्शनजवळ जाऊन ग्राहक क्रमांक २१९०१०३१०८२४ आणि मीटर क्रमांक ०३९०४२९९१४५ चे कनेक्शन तोडले.
याच वेळी वफा मुकादम तिथे आल्या आणि त्यांनी बाजूला ठेवलेली बांबूची काठी उचलून सर्वप्रथम खालील तीनही मीटरवर मारून त्यांचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी तीच काठी घेऊन अचानक विवेक पवार यांच्या डोक्यावर हल्ला केला. पवार यांनी हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला असता, काठी डोक्याला घासून त्यांच्या उजव्या कानावर बसली आणि ते जखमी झाले.
घटनेनंतर विवेक पवार आणि अंकुश घाटाळ बाहेर पडत असताना, साजिद मुकादम देखील गेटजवळ आले. त्यांनी दोघांनाही शिवीगाळ करून “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी दिली. त्यांनी दोघांना धक्काबुक्की करत त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यानंतर, विवेक पवार यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.