रत्नागिरी:- कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टी भागात कमाल तापमानातील वाढ कायम असून, उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. रात्रीचे किमान तापमानही वाढ झाल्याने हवेतील गारवा घटला आहे. त्यामुळे थंडी जवळपास पळाली असून उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या आठवडयापासून दिवसाचे किमान आणि रात्रीच्या कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. बहुतांश भागात दिवसा आकाश निरभ्र राहत असल्याने उन्हाचा चटका जाणवतो आहे. रायगड, ठाणे यासह किनारी जिल्ह्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसा तापमान 30 ते 32 अंश राहत असून किमान तापमानही 20 ते 25 पर्यत मजल घेत आहे. कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 3 अंशांनी वाढले असल्याने दिवसा तीव्र तर रात्री हलका उकाडा जाणवतो आहे.
कोकण विभागातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीजवळ असला, रत्नागिरीसह कोकणात इतर ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. रात्रीच्या किमान तापमानातही सर्वत्र वाढ कायम आहे. तापमानातील वाढीने थंडी गायब झाली आहे.