रत्नागिरी:-.लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केलेल्या जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. प्रदीप प्रीतम केदार (५०) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. प्रदीप याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार हे संगमेश्वर येथे पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदामास जिल्हाधिकारी संगमेश्वर तहसीलदार यांनी २२ मार्च रोजी भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते तसेच त्यानंतर लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी तक्रारदारांच्या अखत्यारितील गोदामाची तपासणी करून धान्यसाठ्यात तफावत तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्या बाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार लोकसेवक केदार यांनी २८ मार्च २०२५ रोजी तडजोडीअंती ११ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले व लाच रक्कम रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रारदारांकडून स्वीकारली. लोकसेवक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.









