चिपळूण:- लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत वाटेल तशी माहिती सोशल मिडीयावरून प्रसारीत केली जात आहे. सातवीला मुलगा देखील आलेल्या माहितीत थोडेशे वाढवून पुढे पाठवत आहे. काही जणांनी तर उदय सामंताची या कंपनीत पार्टनरशीप असल्याचा जावई शोध लावला. अशा कंपन्यांमध्ये पार्टनरशिप करण्याइतपत चिंदीचोर
नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणातील मेळाव्यात विरोधकांना सुनावले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने अजून उत्पादन सुरू केलेले नाही. त्यांच्याकडे अजून चाचण्या सुरू आहेत. त्याबाबतचा अहवाल देण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना दिली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याविषयीचा निर्णय घेतला जाईल. विविध उत्पादनांमध्ये वापरले जाणारे पीएफएएस (पर आणि पॉलिफ्ल्युरोआल्किल) हे रसायन लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये तयार केले जाणार आहे. ते इटलीमध्ये प्रतिबंधित करण्यात आले आहे. भारतात उदयोन्मुख प्रदूषक या वर्गवारीमध्ये अशा उत्पादनांना परवानगी दिली जाते. देशात अनेक ठिकाणी ती याआधीही देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला परवानगी दिली आहे. अर्थात त्यांनी अजून टक्काही उत्पादन घेतलेले नाही. या कंपनीने केवळ आपल्या उत्पादनासाठी चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांमधील वेस्ट (टाकाऊ माल) त्यांनी जाळण्यासाठी तळोजा येथे पाठवण्यात आला आहे. ४ नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. तो अहवाल सकारात्मक असला आणि त्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे उत्पादन प्रदूषणकारी वाटले, त्याने कोकणाच्या निसर्गाला धक्का बसेल, असा निष्कर्ष निघाला तर शासन म्हणून आम्ही त्यावर बंदी घालू. कंपनीने दिलेल्या अहवालावर तज्ञ मंडळी अभ्यास करतील. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. कंपनीतील पार्टनरशिपच्या आरोपाबाबत सामंत म्हणाले, विरोधकांकडून वाटेल ते आरोप सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले जात आहेत. कंपनीच्या उप्तादनाबाबतचे तथ्य जाणून घेतले जात नाही. काहीजण तर सामंताची पार्टनरशिप असल्याचा जावई शोध करू लागलेत. त्यामुळे अशा कंपन्यामध्ये पार्टनरशिप करण्या इतपत मी चिंदीचोर नाही, असा टोला पालकमंत्री सामंत यांनी विरोधकांना लगावला.









