तोतया वकीलाकडून तरुणीला दीड लाखाला गंडा 

नोकरीच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- वकील असल्याची बतावणी करीत तरूणीला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून १ लाख ५५ हजार ७५० रूपये उकळून तिची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडली आहे.

जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपती आणि कंपनीचा लकी ड्रॉ लागल्याची बतावणी करीत ऑनलाईन गंडे घातल्याचे प्रकार उघडकीस आले. लाखो रूपयांचा चुना रत्नागिरीकरांना यातून घातला आहे. हे प्रकार दरदिवशी वाढत असून नामांकित कंपन्यांची नावे घेऊन तसेच अशा कंपन्याचे फेक आयडी पासवर्ड बनवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याला रत्नागिरीकर बळी पडल्याने अनेकांना लाखो रूपयांचा चुना लागला आहे.

केबीसीपाठोपाठ आता चक्क वकील असल्याची बतावणी करीत रत्नागिरी शहरातील एका तरूणीला दीड लाखांचा गंडा घातला आहे. या तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार त्या तरूणीच्या मोबाईलवर योगेश चहल नामक व्यक्तीने आयक्यू कंपनीची लिंक पाठवून फिर्यादी यांना नोकरीला लावतो अशी बतावणी केली. त्याचबरोबर आपण वकील असल्याचेदेखील त्याने त्या तरूणीला सांगितले होते.

एका वकिलाने आपल्याला नोकरीसाठी लिंक पाठवली आहे आणि तेच आपले काम करणार आहेत असे समजून त्या तोतयाच्या आमिषाला बळी पडून तरूणीने वेळोवेळी मागणीनुसार पैसे त्याच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. प्रोसेसिंग फी व अन्य कारणासाठी हे पैसे भरण्यात आले होते. तब्बल १ लाख ५५ हजार ७५० रूपये त्या तरूणीने भरले होते.
दीड लाख रूपये भरूनदेखील नोकरीचा थांगपत्ता नसल्याने आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर त्या तरूणीने थेट पोलीस स्थानक गाठले. योगेश चहल व अन्य एका अनोळखी विरोधात तिने तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविक ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.