रत्नागिरी शहरातील दोघांवर 4 जिल्ह्यांतून तर लांजा येथील एका गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी ठोस आणि परिणामकारक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या आदेशांनुसार, रत्नागिरी शहर आणि लांजा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण तीन सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार, सलमान उर्फ आकाश अशोक डांगे आणि आमिर नजिर मुजावर, यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सलमान उर्फ आकाश डांगे (रा. थिबा पॅलेस माळ नाका, रत्नागिरी) याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात शरीरा विरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अंमली पदार्थ विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अंमली पदार्थ विक्रीमध्ये सराईत असल्याने शहरातील अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात होती, ज्यामुळे समाजजीवनावर विपरीत परिणाम होत होता.
आमिर नजिर मुजावर (रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) याच्यावर शरीरा विरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे रत्नागिरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या दोघांचीही गुन्हे करण्याची प्रवृत्ती बळावल्याने, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी या दोघांना दोन वर्षांकरिता रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रायगड व कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे (रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
गुरुनाथ यशवंत तावडे याच्यावर लांजा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 आणि भा.दं.वि. कलम 457, 380 (घरफोडी व चोरी) सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाई: उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, लांजा पोलीस ठाणे यांनी गुरुनाथ तावडे याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी, राजापूर यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावानंतर, गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे याला दोन वर्षांच्या कालावधीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कडक इशारा मिळाला आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.









