रत्नागिरी:- ३ लाख टाका… ६ लाख कमवा… अशा आशयांची विविध आमिषे दाखवून रत्नागिरीकरांना यापुर्वी अनेक कंपन्यांनी गंडा घातला आहे. आता नवा प्रकार उघडकीस आला आहे. सिट्रस्ट चेक इन्स लिमिटेडच्या क्रिस्टल जम्बो व क्राऊन ग्लोबल स्कीममध्ये ३ लाख रुपये गुंतवून मुदत होऊनही पैसे न मिळाल्याने तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार दिनकर शंकर शितूत (वय ६७, रा. मुरलीधर मंदीरशेजारी, बंदर रोड) यांनी सिट्रस्ट चेक इन्स लिमिटेड शाखा देवरुख, रत्नागिरी येथे क्रिस्टल जम्बो व क्राऊन ग्लोबल या स्कीममध्ये ३ लाख रुपये गुंतवले होते. या स्कीमची मुदत २० डिसेंबर २०१९ पर्यंत होती. स्कीमची मुदत संपल्यानंतर शितुत यांनी शेखर कोतवडेकर या सिट्रसच्या प्रतितनिधीशी संपर्क साधला व पैसे कधी मिळतील याबाबतची विचारणा केली.
पैशाबाबत विचारणा झाल्यानंतर शितुत यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. गुंतवलेल्या रकमेच्या दोन्ही स्कीमची मुदत पुर्ण होऊन १७ महिने उलटून गेले तरीही त्यांना कुठल्याही प्रकारची रक्कम परत मिळालेली नाही. याबाबत स्कीम मॅच्युअर झाल्याबाबत यातील संशयित शेखर कोतवडेकर (रा. रहाटाघर), प्रवीण महाडीक (रा. संगमेश्वर) आणि सिट्रसचे संचालक (नाव गाव माहित नाही) यांना सांगूनही त्यांनी त्याकडे वारंवार दुर्लक्ष केेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनकर शितुत यांनी पोलीस स्थानकाचा मार्ग पकडला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शेखर कोतवडेकर, प्रवीण महाडिक व सिट्रसचे संचालक यांच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.