Thursday, July 16, 2026
spot_img
Home मंडणगड तिडे जंगलात आढळला बेपत्ता वृद्धाचा सांगाडा

तिडे जंगलात आढळला बेपत्ता वृद्धाचा सांगाडा

मंडणगड:- तालुक्यातील तिडे गावातील बोरीचा माळ परिसरात असलेल्या जंगलात एका बेपत्ता वृद्धाचे मानवी अवशेष आणि कपडे आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नारायण महादेव बर्वे (रा. तिडे) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण बर्वे हे २ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, १३ जुलै रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास तिडे गावचे पोलीस पाटील रवींद्र पवार यांनी खबर दिली की, बोरीचा माळ येथील जंगलात एका शिवणीच्या झाडाजवळ मानवी कवटी आणि हाडे दिसून येत आहेत. ही माहिती मिळताच त्यांचे चिरंजीव अविनाश बर्वे आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना गळफास लावल्याच्या खुणा, मानवी कवटी, बरगड्यांची हाडे आणि काही कपडे, चप्पल तसेच टोपी सापडली. या वस्तू पाहून हे अवशेष बेपत्ता नारायण बर्वे यांचेच असल्याची खात्री त्यांच्या मुलाने पटवून दिली. पोलिसांनी या प्रकरणी ए.डी.आर. नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.