रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह आंबा बागायतदार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावात घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुपेश नागवेकर यांनी त्यांच्या ताणदे येथील राहत्या घरी सोमवारी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक आणि शेजारी धावून आले असता, रुपेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
रुपेश नागवेकर हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. आजारपणासोबतच व्यवसायातील आर्थिक विवंचना आणि व्यापाऱ्यांची देणी यांमुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली ती परवानाधारक होती का, याचा तपास केला जात आहे. तसेच, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का, याबाबत पोलीस अद्याप माहिती घेत आहेत.
रुपेश नागवेकर यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे ताणदे गावावर शोककळा पसरली असून ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.









