कोकण रेल्वेची ‘फुकट्या’ प्रवाशांवर सर्जिकल स्ट्राईक; वर्षभरात २७ कोटींचा दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल २७ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, यात रत्नागिरी विभागाने मोठी कामगिरी बजावली आहे.

रत्नागिरी विभागात गेल्या वर्षभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ९ कोटी ४ लाख रुपयांचा दंड जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (७ कोटी ७४ लाख रुपये) या दंड वसुलीत मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत विनातिकीट २१,५२७ जणांवर कारवाई आणि अवैध १०,७४१ तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने प्रवासातील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने वर्षभरात विविध गाड्यांमध्ये अचानक तपासणी करून २,२०४ लोकांवर कारवाई केली. नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनधिकृत प्रवाशांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी प्रवाशांना महत्त्वाचे करताना अनेक प्रवासी तिकीट न काढता रेल्वेच्या पायऱ्यांवर बसून धोकादायक प्रवास करतात. अशा कृत्यांमुळे अपघात होऊन जीव जाण्याचा धोका असतो. प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नेहमी अधिकृत तिकीट काढूनच प्रवास करावा आणि पायऱ्यांवर बसणे टाळावे असे आवाहन केले आहे.