तळवली हायस्कूलमधील ८ संगणक संच चोरीला

गुहागर:- तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या तळवली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चोरी झाली असून जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरीला गेले आहेत. ही चोरी ७ व ८ जूनदरम्यान झाल्याचा अंदाज आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी तत्काळ गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्रशालेतील एका अडगळीच्या खोलीत सर्व संगणक संच ठेवले होते. यात ८ मॉनिटर, ८ सीपीयू, ६ यूपीएस बॅटरी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. कुणालाही येथे हे साहित्य असेल याची शंका येऊ शकणार नाही, असे पाहणी केल्यास दिसते. तसेच मैदानात इमारतीसाठीचे ठेवलेले स्टीलही चोरीला गेले. शाळेत ४ सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही एकाही कॅमेरामध्ये चोर दिसले नाहीत, याचा अर्थ चोरांना येथील पूर्ण माहिती असावी, चोर हे जवळचेच असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.