रत्नागिरी:- दुपारी घडलेल्या वादावादीतून शहरातील क्रांतीनगर येथे सायंकाळी तरुणावर तलवारीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयितांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली आहे. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नंदन उर्फ बंडू गोपीनाथ चव्हाण (वय २६, रा. साठरेबांबर तेलीवाडी-पाली, रत्नागिरी) असे नव्याने अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) रात्री सव्वाआठच्या सुमारास क्रांतीनगर येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्त्यावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र शिवाजी विटकर (वय २५, रा. क्रांतीनगर, महालक्ष्मी मंदिरजवळ, कोकणनगर, रत्नागिरी) यांचा जखमी भाऊ राजेंद्र शिवाजी विटकर याच्याशी दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून संशयित गुरुनाथ नाचणकर व सुशील रहाटे यांनी राजेंद्र याच्या हात व पायावर तलवारीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत राजेंद्र यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होती. या प्रकरणी रवींद्र विटकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत होते. तपासात मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी सापळा रचून शहरातील माळनाका परिसरात गुरुनाथ उर्फ गोट्या प्रताप नाचणकर (वय २६, मिरजोळे-मधलीवाडी, रत्नागिरी), सुशील सुनील रहाटे (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, कोळंबेसडा-रत्नागिरी) या दोघांना अटक केली तर सौरभ अर्जुन सावंत (वय ३३, रा. सुपलवाडी, नाचणे -रत्नागिरी) याने या गुन्हेगारांना आपल्या घरात आश्रय दिला म्हणून तिघांनाही मंगळवारी (ता. १४) दुपारी अटक केली होती.
न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर यातील चौथा संशयित नंदन उर्फ बंडू गोपीनाथ चव्हाण याने राजेंद्र विटकर याला मारण्यासाठी वापरलेली धारदार तलवार गायब करण्यास सहकार्य केले होते. त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील संशयितांकडून दुपारी वादावादी कशामुळे झाली? की एवढे मोठे पाऊल संशयितांनी उचलले हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. संशयित चव्हाण याला बुधवारी (ता. १५) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.