रत्नागिरी:- माझ्यासमोर प्रश्न अनेक आहेत, मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी दिला आहे. यापुढे सर्वसामान्य जनतेसाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग या मुुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून आक्रमक झाल्या आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र गेली १५-१६ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. हजारो चाकरमानी कोकणात येत असतात.दरवर्षी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून या चाकरमान्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सत्ताधार्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्यासाठी आता आंदोलन हाती घ्यावे लागणार असल्याचे घाग यांनी यावेळी सांगितले.
एका महिलेल्या हातात मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे पक्षाला अपेक्षित असलेले काम माझ्या हातून घडेल, असे सांगतानाच त्या पुढे म्हणाल्या की, कॉंग्रेप पक्षाच्या वाढीसाठी तळागाळात जाऊन काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एकेकाळी राज्यासह देशात कॉंग्रेसची सत्ता होती. ते दिवस पुन्हा येतील, असा विश्वास व्यक्त करत हातात हात घालून कामाला सुरूवात करूया असे आवाहनदेखील त्यांनी केले.