पाचल:- तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बबन मांडवकर (४५, कशेळी, आगवेकरवाडी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बी.एन.एस. कलम ७८ (२) व ७९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटना उघड झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयित आरोपीला वाचविण्यासाठी दोन राजकीय पुढारी कारवाई होऊ नये रात्री बारा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यांच्या या भूमिकेमुळे महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, राजकीय दबावामुळे पोलीस तपासावर परिणाम होईल का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान महिला संघटनांनी पुढाकार घेत संशयित आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. आरोपीला राजकीय पाठबळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन राजकीय पुढाऱ्यांच्या कृतीबाबत त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ही बाब पोहोचवणार असल्याचेही या महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेशी निगडित अशा गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. आरोपीविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेबाबत सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, महिला संदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलीस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हा खटला लवकरात लवकर फास्ट-ट्रॅकवर चालवण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे सांगितले. नवदुर्गांचा उत्सव सुरू असताना एका महिलेबाबत घडलेल्या या घटनेची दखल राजापूर लांजा विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घेतली.