रत्नागिरी:- तरुणीशी गैरवर्तन करुन नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन अटी व शर्थीवर मंजूर केला आहे.
संजय शंकर कोकरे (रा. टेंबे – धनगरवाडी, रत्नागिरी), शंकर गोविंद गोरे (रा. सापुचेतळे, रत्नागिरी) संशयितांची नावे आहे. ही घटना ६ एप्रिल २०२३ ला घडली होती. संजय कोकरे याने पीडितेला फोन करुन तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त होती. मात्र, पीडित महिलेने नकार दिला होता. तेव्हा तीने दुसऱ्याशी लग्न केले तर आत्महत्या करेन अशी धमकी संजयने दिली तिला दिली होती. यापूर्वी १५ मार्च २०२३ रोजी रात्री ८.३० वा. ८ सुमारास संजय कोकरे याचा मित्र शंकर गोरे याने पिडीतेच्या वडिलांना फोन करुन बोलवून मुलीचे आक्षेपार्ह फोटो दाखवून संजय कोकरे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर १६ मार्चला पीडितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आली होती. तेव्हा संशयित संजय कोकरे याने पुन्हा त्रास देणार नाही असे ग्रामीण पोलिसांना लिहून दिले होते. मात्र ६ एप्रिलला पीडित तरुणी दुचाकीवरून जात असताना संजय कोकरेने तिची दुचाकी अडवली. बोलण्याचा बहाणा करून तिने लग्नास नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित तरुणीने दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भादवि कलम ३५४ (ड), ३४१, ५०६, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ व ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संशयित संजय व शंकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. संशयिताच्या वतीने अॅड. अथर्व पटवर्धन यांनी काम पाहिले. सरकारी पक्ष व आरोपी पक्षातर्फे युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एल. डी. बिले यांनी अटकपूर्व जामीन अर्ज अटी व शर्थीवर मंजूर केला.