तरुणावर चॉपरने खुनी हल्ला करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

रत्नागिरी:- किरकोळ कारणातून तरुणाच्या पोटात चॉपर मारणार्‍या आरोपीला न्यायालयाने बुधवारी 7 वर्ष सक्तमजूरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना 28 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास जांभरुण बौध्दवाडी येथे घडली होती.

अरविंद अनंत सावंत असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या अरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सुबोध गंगाराम सावंत याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुबोध कामावरुन घरी जात होता. त्यावेळी जांभरुण बौध्दवाडी येथे अरविंदची मोटार सायकल बंद पडल्याने तो त्याचे मित्र ॠतिक दिपक सावंत आणि यश संतोष सावंत यांच्यासोबत तिथे उभा होता. सुबोधने तिथून जाताना त्यांना काय करताय?  असे विचारले याचा राग आल्याने अरविंदने सुबोधला धक्काबुक्की करुन खिशातील चॉपर काढून सुबोध वर उगारला तो वार चुकवताना सुबोधच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर अरविंदने सुबोधच्या पोटात चॉपर मारुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभिर जखमी झालेल्या सुबोधला वाडीतील लोकांनी रुग्णालयात दाखल केले होते.

याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अरविंद सांवत विरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायालयात सुरु असताना सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल प्रफूल्ल सावळी यांनी 12 साक्षिदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी अरविंद सावंतला 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास ग्रामीणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सुनिल आयरे यांनी काम पाहिले.