चिपळूण:- तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथे येथील विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर कढून नैसर्गिक आधिवासात मुक्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (१५ जून) सकाळी चिपळूण वनपरिक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रामधील मौजे तनाळी राधाकृष्णवाडी येथील सहदेव धोंडू बाईत यांच्या घरामागच्या विहिरीत सौ. सनवी सुरज बाईत यांना सकाळी ९ वाजता विहिरीमध्ये बिबट पडलेला दिसला. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील राजेश थरवळ यांना दिली. ही बातमी त्यांनी तात्काळ वनविभागास कळविली. या घटनेची दखल घेत वनपरिमंडळ अधिकारी चिपळूण एस. एस. सावंत, वनपरिमंडळ अधिकारी फिरते पथक रत्नागिरी चिपळूणचे जी.एम. पाटील, वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर राहुल गुंठे, वनरक्षक अनंत मंत्रे, व वाहनचालक नंदकुमार कदम, संजय अंबोकर हे वन विभागाचे बचाव पथक सामग्री व अधुनिक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले व विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्यास काही वेळातच सुखरूप बाहेर काढले.
विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. कणसे यांनी पाहणी करून तो सुस्थितीत असल्याची खात्री केली. हा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे अंदाजे वय दोन ते अडीच वर्षे असल्याचे सांगितले. हा बिबट सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत अहवाल दिला. त्यासअनुसरून वन विभागाचे बचाव पथकाने या बिबट्यास सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
वन विभागाचे बचाव पथकामध्ये परिमंडळ अधिकारी एस. एस. सावंत, वनपरिमंडळ अधिकारी फिरते पथक रत्नागिरी चिपळूणचे जी. एम. पाटील, वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर राहुल गुंठे, वनरक्षक अनंत मंत्रे, व वाहनचालक नंदकुमार कदम यांनी सक्रिय कामकाज करत बिबट्याला केवळ अर्ध्या तासामध्येच स्थानिक व ग्रामास्थांच्या मदतीने बाहेर काढले. या बचाव पथकास श्रीमती गिरीजा देसाई, विभागीय वनअधिकारी व श्रीमती प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक व एस. एस. खान वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीत बिबट आल्यास किंवा संकटात सापडल्या त्याबाबतची माहिती वनविभागास कळवण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस. एस. खान यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधवा, असे अहवान केले आहे.