डेल्टा प्लस विषाणूचा जिल्ह्यात पहिला बळी

रत्नागिरी:- दोन महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास पंचवीस हजारहून अधिक रुग्ण सापडले असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित झालेले नऊ रुग्ण सापडलेले असतानाच, डेल्टा प्लसने संक्रमित झालेल्या 80 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. बारा दिवसापूर्वीच या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू होता. परंतु त्यावेळी ही महिला डेल्टा प्लसने संक्रमित असल्याची गोष्ट आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली नव्हती. महिलेल्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी अहवाल प्राप्‍त झाल्यावर ही गोष्ट स्पष्ट झाली.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत  महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित 21 रुग्ण सापडल्याच माहिती शुक्रवारी दिली. यातील नऊ रुग्ण या नव्या व्हेरियंटने संक्रमित झाले होते. त्यातील 80 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही रुग्ण महिला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यात एकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. 13 जून रोजी या 80 वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला आहे. या महिलेला अन्य आजारही होते. या महिलेवर उपचार सुरु असतानाच तिचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल 20 जून रोजी जिल्ह्याला प्राप्‍त झाला. यात डेल्टा प्लसने संक्रमित असलेल्या रुग्णांची माहिती नमुद करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाकडून या डेल्टा प्लसने संक्रमित रुग्णांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी या महिलेचा आधीच मृत्यू झाल्याची बाब पुढे आली.