डुप्लिकेट क्रेडिट कार्डद्वारे महिलेला लाखोंचा चुना लावणारा गजाआड 

रत्नागिरी:- डुप्लिकेट क्रेडिट कार्ड मिळवून वेळोवेळी पैसे काढून सुमारे 8 लाख 85 हजार 29 रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी लातूर येथून एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोबाईल लिंकव्दारे ही फसवणूकीची घटना घडली होती.

या बाबत फेडरल बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक सुमित विश्‍वनाथ बागडिया (35, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्या बँकेत सायली सचिन पाटील (रा. चिंचखरी, रत्नागिरी) यांचे खाते आहे. त्यांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हा सध्या लातूर येथील अज्ञात व्यक्‍ती वापरत आहे. त्याव्दारे त्याने सायली पाटील यांच्या नावाच्या क्रेडिट कार्ड लिंकव्दारे पत्ता बदलून तो स्वतःचा लातूर येथील अशोक हॉटेल, अमृता ट्रॅव्हल्स असा केला. तसेच त्याने सायली पाटील यांचे खाते असलेल्या फेडरल बँकेकडे मोबाईल लिंकव्दारे मागणी करुन सायली पाटील यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड प्राप्त केले. त्या नंतर वेळोवेळी लातूर येथे एकूण 8 लाख 85 हजार इतकी रक्‍कम काढून अपहार करत बँकेची फसवणूक केली. 

फेडरल बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक सुमित विश्‍वनाथ बागडिया (35, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा.द.वि.क. ४०६,४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु केला व तांत्रिक माहिती च्या आधारे आरोपीत याचे नाव तसेच पत्ता निष्पन्न व निश्चित केला.त्यानुसार पोलिसांचे एक पथक लातूरला रवाना झाले.

लातुर येथील नागरिकाकडुन गोपनिय माहिती च्या आधारे आरोपी निष्पन्न करुन गोपाळ भुजगराव जाधव (वय २८ )यास स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले व तपासकामी रत्नागिरी येथे आणुन फसवणुकीच्या गुन्ह्यात  गोपाळ भुजगराव जाधव अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

हि कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.मोहीत कुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे रत्नागिरी याचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनित चौधरी पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे , पोलीस नाईक १२४ संकेत महाडीक पोना ४४४ रमीझ शेख , पोकॉ ४८४ अमित पालवे यांनी केली.