Sunday, May 31, 2026
spot_img
Home खेड डंपरची रिक्षाला जोरदार धडक; एका प्रवाशाचा मृत्यू तर रिक्षाचालक गंभीर

डंपरची रिक्षाला जोरदार धडक; एका प्रवाशाचा मृत्यू तर रिक्षाचालक गंभीर

खेड भरणे-खेड मार्गावरील घटना

खेड:- तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भिलारे हे आपल्या रिक्षाने (क्रमांक MH 08 AQ 8784) भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. आठवडा बाजार परिसराच्या जवळ पोहोचले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

​या अपघातात रिक्षात असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, ती व्यक्ती रिक्षामध्ये प्रवासी म्हणून प्रवास करत होती की रस्त्यावर रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवत असताना डंपरची धडक बसली, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. पोलीस मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालक संतोष भिलारे यांना स्थानिक नागरिक आणि मदतीसाठी आलेल्या टीमने तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

​अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. डंपरच्या या निष्काळजीपणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, डंपर चालकाचा शोध घेतला जात आहे.