ठेकेदाराकडून 50 हजारांची लाच स्वीकारताना खेड पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात

रत्नागिरी:- 14 उपकेंद्रांची दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणाच्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याकरीता ठेकेदारकडे बिलाच्या दोन टक्के रक्कम मागणाऱ्या खेड पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता गमरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. 

यातील तक्रारदार हे नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांना मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्रांतर्गत १४ उपकेन्द्रांची दुरुस्ती व अदयावतीकरण करणेकरीता ई- निवीदा भरलेली होती. त्या अनुषंगाने निविदा रक्कम 50 लाख 6 हजार 491 रुपये प्रमाणे काम करण्याचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. या कामाची देखरेख व कामाचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेमार्फत कनिष्ठ अभियंता लोकसेवक गमरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 

तक्रारदार ठेकेदार यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या कामाचे मुल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करणेकरीता लोकसेवक गमरे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाच्या रक्कमेच्या २ टक्केप्रमाणे 60 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. म्हणुन तक्रारदार यांनी लोकसेवक चंद्रकांत गणपत गमरे यांचेविरुध्द ॲन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी येथे 24 सप्टेंबर रोजी लाचेच्या मागणीची तक्रार दाखल केली.  

सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 24 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये लोकसेवक चंद्रकांत गणपत गमरे, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांनी केलेल्या कामाचे मुल्यांकन वरिष्ठ कार्यालयात सादर करणेकरीता केलेल्या कामाच्या रक्कमेच्या 2 टक्के प्रमाणे 60 ते 70 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे व ती स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
 

पडताळणीमध्ये निष्पन्न झालेनुसार तक्रारदार यांचे प्रलंबित कामापैकी काही काम झाल्यानंतर त्या कामाचे मुल्यांकन करुन बील मंजुरीकरीता वरीष्ठ कार्यालयात पाठविणेकरीता तक्रारदार यांचेकडुन मागणी केलेल्या रक्कमेपैकी 50 हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन स्विकारल्यानंतर त्यांना दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी 1.43 वाजता गणेशनगर भरणे ता . खेड , जि . रत्नागिरी येथे पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे.

सदरची सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री . सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . प्रविण ताटे , सपोफौ संदीप ओगले , पोलीस हवालदार संतोष कोळेकर , विशाल नलावडे , पोलीस नाईक योगेश हुंबरे , पोलीस शिपाई हेमंत पवार , राजेश गावकर यांनी केली आहे .