रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथे काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना न्यायालयाने २ वर्षे कारावास व प्रत्येकी ५ हजार दंडाची शिक्षा ठोठावली होती. २३ वर्षांनंतर ही शिक्षा येथील न्यायालयाने कायम केली.
प्रकाश दत्ताराम कोलगे (वय ५५), अशोक दत्ताराम कोलगे ५६, आणि विकास दत्ताराम कोलगे (सर्व रा. नेवरे-बाजारपेठ, रत्नागिरी) अशी आरोपींची नावे आहे.
ही घटना ७ ऑगस्ट १९९३ ला दुपारी पावणेचारच्या सुमारास नेवरे-बाजारपेठ येथे घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदकुमार अनंत खेर ( रा. नेवरे, रत्नागिरी) आणि संशयित यांच्यात सहा ते सात वर्षापासून जमिनीच्या कारणावरुन वाद होता. संशयितांनी फिर्यादींचे वडिल यांच्याकडे २ मळे जमिन मागितली होती. ती जमीन देण्यास फिर्यादी नंदकुमार यांनी विरोध केला होता. याचा मनात राग धरुन ७ ऑगस्टला नंदकुमार खेर हे नेवरे येथे दुकानाजवळील पाखडीने आपल्या घरी जात असताना संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करुन हातातील काठीने नंदकुमार यांच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर, छातीवर मारुन गंभीर दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नंदुकमार खेर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपासात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. अेम. पाटील यांनी संशयितांना अटक केली. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या १९९४ न्यायालयात या गुन्ह्याची सुनावणी झाली. हा खटला जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. परांजपे यांनी आरोपींना प्रकाश कोलगे व अशोक कोलगे यांना २ वर्षे कारावास व प्रत्येक ५ हजार दंड, दंड न भरल्या एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली होती. तर या खटल्यातून आरोपी विकास कोलगे याला दोषमुक्त केले होते.
दरम्यान, संशयितांनी ३० एप्रिलला १९९८ ला गुन्ह्यातील खटल्यासाठी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली मात्र न्यायालयाने २०२१ ला संशयितांची शिक्षा कायम केली. त्यानंतर २ फेब्रुवारीला २०२४ ला न्यायालयाने ग्रामीण पोलिसांकडे वारंट बजावला होता. गोपनिय माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार संजय शिवगण, पोलिस फौजदार सुनिल आयरे, पोलिस कॉन्स्टेबल ब्रह्मदेव सवाईराम चालक प्रवीण सनगरे यांनी मंगळवारी (ता. ५) संशयितांना नेवरे येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम करुन दोघा आरोपींची शिक्षेसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.