Friday, September 18, 2026
spot_img
Home खेड ट्रिपल सीट मोटारसायकल घसरल्याने स्वाराचा मृत्यू

ट्रिपल सीट मोटारसायकल घसरल्याने स्वाराचा मृत्यू

खेड तालुक्यातील भेलसई येथे भीषण अपघात

खेड:- तालुक्यातील भेलसई-चौथाई पूल येथे मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपेश सुरेश धाडवे (वय ३४, रा. भेलसई धाडवेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत रूपेश धाडवे हे दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री पावणेअकरा (२२.४५) वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील यामाहा कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच ०३ सीएफ २१७७) वरून आंबडस ते भेलसई असा प्रवास करत होते. त्यांच्या गाडीवर ट्रिपल सीट (तिघे जण) प्रवास सुरू होता.

मोटारसायकल भेलसई चौथाई पुलावर आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल अचानक स्लीप होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात रूपेश धाडवे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथील ‘लाइफ केअर हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सदर अपघाताची नोंद सुरवातीला चिपळूण पोलीस ठाण्यात (जा.क्र. १००४१/२०२६, दिनांक १३/०९/२०२६) आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी हे कागदपत्रे खेड पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ४२ मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.