रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावजवळील चहाच्या टपरीवर ट्रक चालकांचा किरकोळ कारणातून वाद झाला. या वादावादीत एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मॅनेजरने ट्रक चालकाच्या नाकावर बुक्का मारुन दुखापत केली. रक्तबंबाळ झालेल्या चालकाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या उपचार सुरु आहेत.
यदूनाथ बाईग असे संशयित मॅनेजरचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप येथील जलतरण तलावजवळील चहाच्या टपरीवर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जखमी चालक सतीश बब्रुवान नायकवडी (वय ५५, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) हे जलतरण तलाव येथे महिला चालवत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी ट्रान्स्पोर्ट कंपनीचा मॅनेजर व दुसरा ट्रक चालक महेश घाटगेही होते. या दोघांमध्ये जमिन जाग्याच्या व्यवहारावरुन वरुन चर्चा सुरु होती. त्यावेळी जखमी सतीश नायकवडी यांनी जमीन त्याच्या नावावर करुन द्या असा सल्ला दिला. या कारणावरुन संशयित यदुनाथ बाईंग यांनी ट्रक चालक सतीश नायकवडी यांना ढकला बुकल करुन मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर व नाकावर जोरदार प्रहार केला. यामध्ये सतीश यांच्या नाकाचा घोंगणा फुटला. रक्तबंबाळ झालेले सतीश स्वतः रिक्षा करुन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. जखमी सतीश नायकवडी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









