टीडब्ल्यूजे कंपनी विरोधात गुंतवणूकदार आक्रमक

चिपळूण पोलिस ठाण्यात जाब; नार्वेकर दाम्पत्याला अटक न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

चिपळूण:- टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाही अद्याप अटक न झाल्याने सोमवारी गुंतवणूकदारांचा संताप अनावर झाला. संतप्त गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलिस ठाण्यात एकत्र येत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नार्वेकर याला अटक न झाल्यास आत्मदहनाचा टोकाचा इशारा यावेळी देण्यात आला.

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून टीडब्ल्यूजे कंपनीत अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काही कालावधीपर्यंत परतावा देण्यात आल्यानंतर समीर नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. एकामागोमाग एक फसवणुकीचे प्रकार उघड होत गेल्यानंतर गुंतवणूकदारांची संख्या आणि रक्कम लक्षात घेता या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर यांच्यासह कंपनीचा प्रतिनिधी संकेश घाग व अन्य काही जणांवर महिन्यांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीचे प्रतिनिधी बेपत्ता असताना त्यांची चौकशी करणाऱ्या काही गुंतवणूकदारांवरच तक्रारी दाखल करण्यात आल्याने गुंतवणूकदार अधिकच संतप्त झाले आहेत. नार्वेकर याला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, तपासाला जाणीवपूर्वक विलंब होत आहे का, राज्यातील पोलिस यंत्रणा आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही गुंतवणूकदारांनी केला. या संदर्भात राज्यातील मंत्र्यांकडे निवेदने व तक्रारी देऊनही कोणतीही दखल घेतली नसल्याने ‘आम्हाला न्याय कधी मिळणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अखेर संतापाच्या भरात गुंतवणूकदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत अटक न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.