चिपळूण:- चिपळूणमध्ये टीडब्ल्यूजे ट्रेड विथ जॅझ असोसिएट प्रा.लि. कंपनीवर दुसरा गुन्हा चिपळूणमध्ये दाखल झाला आहे. पहिला गुन्हा यवतमाळ शहरातील चौघा गुंतवणूकदारांची तब्बल 39 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, या कंपनीने एकूण ३ कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, आता दुसरा गुन्हा हा चिपळूणमध्ये दाखल झाला आहे.
‘फ्रेंचायझी बिझनेस अॅग्रीमेंट’च्या नावाखाली अधिक परताव्याचे आमिष दाखवून राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
चिपळूण तालुक्यातील कामये माटेवाडी येथील ठेकेदार प्रतिक दिलीप माटे (वय २९ वर्षे) यांच्यासह त्यांच्या बहिणीची तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुहागर आणि चिपळूणमधील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर सभाष नार्वेकर, रा. गुहागर, नेहा समीर नार्वेकर, रा. गुहागर, संकेश रामकृष्ण घाग, रा. चिपळूण, सिध्देश शिवाजी कदम, रा. कामथे, ता. चिपळूण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हा क्रमांक २१६/२०२५ २२ सप्टेंबर २०२५, रात्री ९.३८ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ३(५) गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.