टीआरपी येथील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील नाचणे, टीआरपी येथील आदिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा परकार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. धिरज रामजी परमार असे त्यांचे नाव असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मयत धिरज परमार यांना गेल्या काही काळापासून मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर डॉ. शेणई यांच्याकडे नियमित उपचार सुरू होते. १७ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. ​त्यामुळे त्यांचे चिरंजीव लेखराज धिरज परमार यांनी त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी शहरातील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

​या घटनेबाबत परकार हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. लेखराज परमार यांनी दिलेल्या खबरीनुसार, पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू दाखल केला आहे.