रत्नागिरी:- शहरातील टिळकआळी येथील विक्रम प्रसाद आर्केडमधील श्रीरंग एन्टरप्रायझेस या दुकानात भरदिवसा चोरी झाली. चोरीची ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
चोरी झाल्याची घटना ही 28 डिसेंबर रोजी घडली होती. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या चोरीने खळबळ उडाली. याबाबतची फिर्याद गणेश अशोक रानडे (40, जनरल स्टोअर्स मालक, विश्वेश्वर अपार्टमेंट, टिळकआळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रानडे यांचे टिळकआळीतील विक्रम प्रसाद आर्केड मध्ये श्रीरंग एन्टरप्रायझेस नावाचे जनरल स्टोअर्स आहे. या दुकानात 28 रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास पांढर्या रंगाचा हाफ शर्ट व पांढर्या रंगाची फुल पॅन्ट घातलेला तसेच कोरीव दाढी असलेला 20 ते 25 वयोगटातील तरुण चोरी करताना दिसत आहे. या तरुणाने दुकानाच्या काउंटरचे ड्रॉवर उघडून त्यातील 18 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे. या चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.