टिके येथे भाड्याने दिलेला जनरेटर परत न करता 8 लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके येथे एका रेल्वे ठेकेदाराची आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठेकेदाराने भाड्याने दिलेला जनरेटर आरोपींनी स्वतःसाठी वापरला आणि त्याचे भाडेही दिले नाही. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रीनिवासराव गोपालकृष्णय्या गोगीनेनी (वय ५७, धंदा रेल्वे कॉन्ट्रॅक्टर, रा. मिरजोळे) यांच्या ‘आदित्या कन्ट्रक्शन’ या कंपनीमार्फत ते एल. अँड टी कंपनीकडून रेल्वेची कामे घेतात. त्यांचा परिचय जय कदम (पूर्ण नाव माहित नाही, रा. भातगांव, ता. गुहागर) या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरशी होता.

गोगीनेनी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी टिके येथे एल. अँड टी कंपनीच्या मालकीचा आणि त्यांच्या ताब्यात असलेला दोन लाख रुपये किमतीचा होंडा कंपनीचा लाल रंगाचा ७.५ केव्हीचा जनरेटर भाड्याने दिला होता. त्याचे एका महिन्याचे १५ हजार रुपये प्रमाणे ४० महिन्यांचे सहा लाख रुपये भाडे असे एकूण आठ लाख रक्कम आरोपी जय कदम आणि कणाल जय कदम (रा. भातगांव, ता. गुहागर) यांच्याकडून येणे अपेक्षित होते.

आरोपींनी तो जनरेटर स्वतःसाठी वापरला आणि फिर्यादी यांना अद्याप परत केलेला नाही. तसेच, जनरेटरचे सहा लाख रुपये भाडेही दिलेले नाही. अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी जय कदम आणि कणाल जय कदम यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान १८६० चे कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.