झरेवाडीत लांडोरची शिकार; शिकारी वनविभागाच्या जाळ्यात

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथे लांडोर पक्षी एअर गनने मारणार्‍या दोन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले.त्यांच्याकडून एअर गन, मांसाचे तुकडे, पिसे व अर्धवट जळलेल्या अवस्थेत अवयव मिळून आले. वनविभागाने ही कारवाई गुरुवारी दुपारच्या सुमारास केली.

हरिश्चंद्र बाबू गोताड (42) आणि प्रभाकर जानू गोताड (48,दोन्ही रा.झरेवाडी,रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.गुरुवारी वनविभागाला लांडोर मारण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार  वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी  आणि रत्नागिरी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी हरिश्चंद्र गोताड आणि प्रभाकर गोताड या दोघांच्या घरी छापा टाकला.तेव्हा दोघांच्या घरी फ्रिजमध्ये मारण्यात आलेल्या लांडोरचे खाउन उर्वरित राहिलेले मांस मिळून आले.तसेच त्यांच्या घरात लांडोरची पिसे,अर्धवट जळलेल्या अवस्थेतील टाकावू अवयव मिळून आल्याने संशयितांना ताब्यात घेउन त्यांच्याकडील सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.दोन्ही संशयितांची चौकशी करण्यात आल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये लांडोर हा वन्यप्राणी अनूसूची 1 मध्ये येतो.त्याची शिकार केल्यास 3 ते 7 वर्षांचाा कारावास आणि 10 हजार दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.

ही कारवाई रत्नागिरी (चिपळूण) दिपक पोपटराव खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन बाबूराव निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका पंढरीनाथ लगड,पालीचे वनपाल गौ.पि.कांबळे, जाकादेवीचे वनरक्षक महादेव गणपती पाटील, कोर्लेचे वनरक्षक सागर पाताडे यांनी केली.