रत्नागिरी:- मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली असून दोन दिवस दुपारी सुर्यदर्शन होत आहे. मागील महिन्यात शेवटच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे 33 टक्के पेक्षा अधिक भातशेतीचे 234 हेक्टरचे नुकसान झाले. शेतकर्यांना मदतीसाठी 21 लाख 34 हजार रुपये निधीची तरतदू करावी लागणार आहे. यामध्ये संगमेश्वर, गुहागर तालुक्यात शेतकर्यांचे नुकसान झालेले नाही.
मॉन्सूनचे आगमन जुन महिन्यात शेवटच्या आठवड्यात झाले. त्यानंतरही पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात होता; मात्र जुलैच्या अखेरीस सलग आठ दिवस मुसळधार पावसाने ठाण मांडले होते. जिल्ह्यातील सर्व मोठ्या नद्यांना पूर आला होता. किनारी भागातील भातशेती पाण्याखाली होती. घरे, दुकानेही बाधित झाली आहेत. पाऊस लांबल्यामुळे भात लावण्याही रखडल्या होत्या. नदी किनारी परिसरातील भात लावण्या लवकर आटपून घेण्यात आल्या; मात्र पुरामुळे गाळमिश्रीत पाणी शेतीत शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामेही करण्यास सुरवात झाली. जुन आणि जुलै या दोन महिन्यातील नुकसानीचा अहवाल जिल्हाप्रशासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये 1 हजार 062 शेतकर्यांना पुराचा फटका बसला आहे. त्याच्या 233.94 हेक्टर क्षेत्राचे 21 लाख 34 हजार 422 रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 0.05 हेक्टरचे भाजीपाल्याचे क्षेत्राचा समावेश आहे. पुरामुळे जमीन वाहून गेल्यामुळे 0.11 हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसला आहे.









