खेड:- चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग काढून गोटल नामक दोघां बंधूनी पवार नामक दोघा बंधूना व त्यांच्या वडीलांना शिवीगाळ व दमदाटी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. झालेल्या हाणामारीत पवार नामक एक बंधू जखमी झाला आहे.
या घटनेची अजित आत्माराम पवार ( 21, रा. उधळे – बौद्धवाडी) यानी फिर्याद दाखल केल्यानंतर शुभम रामचंद्र गोटल व स्वयंम रामचंद्र गोटल (रा. उधळे बुद्रुक – कदमवाडी) या दोघां बंधूविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना तालुक्यातील उधळे अंगणवाडी येथील कच्च्या रस्त्यावर दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता घडली.
फिर्यादी अजित आत्माराम पवार व त्यांचा भाऊ अनिरुद्ध आणि त्यांचे वडील आत्माराम पवार हे तिघे घरी जात असताना आरोपी शुभम गोटल व स्वयंम गोटल यांनी त्यांना रस्त्यावर अडवून पवार बंधूना व त्यांच्या वडीलांना शिवीगाळी, दमदाटी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी शुभम याने अजित याला हाताचे थापटाने मारहाण केली व त्याच्या टि-शर्टला पकडून त्याला जमिनीवर पाडले. अजित पवार याच्या वडीलांनी गोटल बंधूना समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच धक्काबुक्की केली. आरोपी स्वयंम गोटल याने जमिनीवरील दगड उचलून अनिरुद्ध पवार याच्या डोक्यात मारून त्याला दुखापत केली, तसेच अजित पवार याची आई सौ. आरती हिने आरोपी गोटल बंधूंना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सौ. आरती हिला शिवीगाळी, धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. म्हणून गोटल बंधूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.