रत्नागिरी:- जिल्हा परिषद आरोग्य विभागाला नव्याने २७ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असून आणखी चार रुग्णवाहिका येत्या काही दिवसात मिळणार आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम होणार असून रुग्णवाहिके अभावी दुर्गम भागात रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी दिली.
कोरोना कालावधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी रुग्णवाहिका मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले होते. खनिकर्म विभागाकडील जिल्हा परिषदेला मिळणार्या निधीमधून आणि आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार ऐन कोरोना कालावधीमध्ये २६ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे चार चाकी रुग्णवाहिका काही वर्षांपुर्वी घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध होती. त्या चालवणेही अशक्य असल्यामुळे निकषानुसार ४७ रुग्णवाहिका निर्लेखित करण्यात आल्या. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्याचा वापर सुरुच ठेवण्यात आला होता. कोरोनातील परिस्थितीमुळे जुन महिन्यात नवीन रुग्ण वाहिकांसाठी प्रयत्न सुरु झाले. पहिल्या टप्प्यात आलेल्या रुग्णवाहिका गरज असलेल्या आरोग्य केंद्रांकडे देण्यात आला. दुसर्या टप्प्यात ३१ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून मंजूर झाल्या. त्यातील २७ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे दाखल झाल्या आहेत. अजुन चार रुग्णवाहिका येणार आहेत. एकुण ६७ आरोग्य केंद्रांपैकी ५७ ठिकाणी या नवीन रुग्णवाहिका कार्यरत होत आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.