जि. प. अध्यक्ष रोहन बने यांचा राजीनामा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद विषय समिती सभापतींपाठोपाठ अध्यक्ष रोहन बने यांनी पदाचा राजीनामा मंगळवारी कोकण आयुक्तांकडे सादर केला. बनेंच्या राजीनाम्यामुळे अध्यक्षांचा पदभार उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्याकडे देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून आता कोण होणार नवा अध्यक्ष याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुदत वाढीची शक्यता बारगळल्यानंतर अध्यक्षपदाच्या पदभाराचा प्रश्‍न निर्माण झाला. संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी उपाध्यक्षांसह सर्व सभापतींना राजीनामे सादर करण्याचे आदेश दिले होते. आयत्यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी अध्यक्षपदाचा पदभार काही दिवस आपल्याकडे रहावा यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यामुळे सोमवारी उपाध्यक्षांचा राजीनामा थांबवण्यात आला आणि अध्यक्ष बने यांनी राजीनामा द्यावा यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात झाली. अखेर रोहन बने यांनी पक्षाच्या आदेशाला अनुसरुन मंगळवारी लगेचच कोकण आयुक्तांकडे राजीनामा सादर केला.

त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार याकडे नजरा लागल्या आहेत. सद्यस्थितीत आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव तसेच जेष्ठ सदस्य उदय बने यांची नावे चर्चेत आहेत.