रत्नागिरी:- जिवंत खवलेमांजराची तस्करी करणाचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात तिघा संशयितांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास धोपावे (ता. गुहागर) येथे ही कारवाई केली. वन्य प्राण्यांच्या तस्करीचा हा सलग दुसरा प्रकार आहे. परवाच सीलप्राण्याच्या दाताची तस्करीचा प्रकार उघड झाला होता.
महेश महिपती पवार (वय ४३), संदेश शशिकांत पवार (वय ३६,) दोन्ही रा. आगरवायंगनी दापोली आणि मिलिंद जाधव (वय ४२, रा. धोपावे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. वन विभागाला वन्य प्राण्यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून काल रात्री धोपावे येथे सापळा लावण्यात आला होता. संयुक्त पथकाकडुन वाहनांची तपासणी सुरू असताना लाल रंगाच्या लोगन गाडीमध्ये जीवंत खवलेमांजर सापडले. तिन्ही संशयित खवल्या मांजराची तस्करी करत असल्याचे आढळुन आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही क्लेमेंट बेन, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग,विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, वनसंरक्षक श्री. निलख आणि निरीक्षक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनरक्षक सागर गोसावी, संजय रणधिर, राहुल गुंठे, पोलिस हवालदार प्रशांत बोरकर, शांताराम झोरे, बाळू पालकर, व्हाईड लाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोचे विजय नांदेकर यांच्या संयुक्त पथकाने हीकारवाई केली.