जिल्ह्याला ७ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

शुक्रवारी दिवसभर पावसाची हजेरी; समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. समुद्रसपाटीवर एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीवर तयार झाला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ७ जुलै पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५९.८३ च्या सरासरीने ५३८.५३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 

समुद्रसपाटीवरील एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीवर आहे. तसेच पश्चिम राजस्थान आणि ईशान्य मध्य प्रदेशात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ६ व ७  जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 प्रामुख्याने मुंबई, पुणे शहरासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा या घाटमाथ्यांना तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील सात दिवसांत वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य राजस्थान, गुजरात प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.