जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक भागात पूरस्थिती

रत्नागिरी:- गेेले सहा दिवस झाले रत्नागिरी जिल्ह्यास पावसाने चांगलेच झाेडपून काढले आहे. बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांना त्रास झाला. काही भागातील भात शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जाेर कमी असल्याने आता सखल भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे काेकणातील शेतकरी भात शेतीचे नुकसान हाेईल की काय या चिंतेत पडले आहेत.

सततच्या पडणा-या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पावसमधील सखल भागात देखील पाणी शिरलं होते. गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी, समाधी मार्गावरील सखल भागात पाणी शिरलं. मुसळधार पावसानं गौतमी नदी ओसंडून वाहत आहे. सध्या पावसानं उसंत घेतली असून सखल भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. सध्या रिमझिम स्वरूपाचा जिल्ह्याच्या काही भागात पाहायला मिळत आहे.

फुणगूस येथील शास्त्री खाडीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भात शेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे अर्धवट सोडून घरचा मार्ग पत्करावा लागला आहे.

शेतात काढून ठेवलेल्या भाताची रोपं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलीत. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. दत्तमंदिर नदीला ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीत पाणी घुसले होते. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत होते. आता पाऊस कमी झाल्यानं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.रत्नागिरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेंभेपूल भागातील सखल भागात पाणी शिरले आहे. पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे. नदीचं पाणी आसपासच्या सखल भागात शिरले आहे. यावेळी टेंभेपूल भागातील समाजमंदिर भागापर्यंत पाणी शिरलं होतं. सध्या पावसानं विश्रांती घेतली असून नदीचा पूर ओसरला असून सखल भागात साचलेलं पाणी देखील आता ओसरायला सुरूवात झाली आहे.