दाभोळेत दरड कोसळून वाहतूक ठप्प; माखजन बाजारपेठेत गडनदीचे पाणी घुसले
रत्नागिरी:- शनिवारी दिवसभर रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर या तीन तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नद्यांच्या पातळ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे येथे घाटात दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. त्यामुळे महामार्गावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. तासाभरात हा मार्ग पूर्ववत करण्यात आला. संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदीला पूर आल्याने नदीपात्रातील पाणी बाजारपेठेत घुसल्याने माखजन बाजारपेठेला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी झाडे कोसळून रस्ते बंद झाले होते. तर वाड्यांना जोडणाऱ्या साकवांवरून पाणी जात असल्याने काही वाड्यांचा संपर्क तुटला होता.
सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने संगमेश्वर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसल्याने दुकानातील मालाची हलवाहलव करण्यात व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गडनदीच्या पुराचे बाजारपेठेत आल्याने माखजन बाजारपेठेकडून सरंद हा रस्ता बंद झाला आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील यंत्रसामग्रीने (जेसीबी) दरड बाजूला करण्यात आली आहे. दरड बाजूला करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूकडील वाहतुक सुरळीत सुरू झाली आहे.
शनिवारी दुपारी 4.15 च्या सुमारास दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र प्रसंगावधान जाणून महामार्गावरील कामगाराने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाभोळे महामार्ग मृत्युंजय दूत ग्रुपचे प्रतिनिधी दीपक कांबळे, काका हिरवे आणि रविंद्र सुकम यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहतुकीचे नियमन केले. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान महामार्गावर चिखलमिश्रित पाणी जोरदार वाहत असल्याने दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय येत होता.









