रत्नागिरी:- कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहीमेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पहिली मात्रा घेणार्यांचे प्रमाण 96.36 टक्के असले तरीही 18 ते 44 वयोगटातील 74 टक्केच लोकांचा प्रतिसाद मिळाला. उर्वरित सर्व गटातील लोकांचे लसीकरण योग्य पध्दतीने सुरु आहे. दुसरी मात्रा घेणार्यांचा टक्का 73.20 असून दोन मात्रा घेतलेले जिल्ह्यातील 7 लाख 91 हजार 900 जणं लसवंत झाले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची तिव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून लसीकरण मोहीमेवर अधिक भर दिला आहे. राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या आढाव्यात ग्रामीण भागातील लसवंतांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती चांगली आहे. लसीकरणासाठी पात्र ठरलेल्यांची संख्या 10 लाख 81 हजार 900 होती. त्यातील 10 लाख 42 हजार 518 जणांनी पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा घेणार्यांची संख्या 7 लाख 91 हजार 900 आहे. पहिला मात्रा घेणार्यांमध्ये फ्रंट वर्कर, आरोग्य यंत्रणा यांच्यासह 45 ते 59 वयोगट आणि 60 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण शंभर टक्केहून अधिक झाले आहे; मात्र पहिली मात्रा न घेणार्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील लोकांचा समावेश जास्त आहे. या वयोगटातील 6 लाख 65 हजार 900 जणं पात्र असून त्यातील 4 लाख 87 हजार 346 जणांनी पहिली मात्रा तर 3 लाख 47 हजार 347 जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद
जिल्ह्यात बुस्टर डोस घेण्यासाठी 34 हजार 429 जणं पात्र असून आतापर्यंत 6 हजार 176 जणांनी लाभ घेतला आहे. तसेच 15 ते 17 वयोगटातील 71 हजार 744 जणांना पहिला डोस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 43 हजार 320 मुलांनी पहिला डोस घेतला असून हे प्रमाण 60.38 टक्के आहे.









