जिल्ह्यात 8 हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण 

रत्नागिरी:- कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत 8 हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजून 20 टक्के काम शिल्लक असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात 68 हजार हेक्टरवर भात लागवड झाली असून मुसळधार पावसामुळे हळवी आणि निमगरवी प्रकारची भातांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याबरोबर कापलेलं भात वाहून गेलेल्यांचे प्रमाण दहा टक्के आहे. बहूतांश भातं ही पावसामुळे आडवी होऊन पाण्यात राहील्याने बाधित झाली आहेत. त्याचा दर्जाही घसरलेला असून घरात वापरण्यायोग्य तांदुळ मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसात पंचनामे पूर्ण करा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता. 29) हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पावसामुळे भातशेतीचे सुमारे 10 हजार हेक्टरपर्यंत नुकसान जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभाग कामाला लागला आहे. मंत्री, विरोधी पक्षनेते शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन फिरत असल्यामुळे सरसकट पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे.

राज्य शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. त्याचे वितरण लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषानुसार 1 ते 10 गुंठ्यापर्यंत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एक हजार रुपये मदत वाटप केले जाते. दहा गुंठ्यांच्या पुढे नुकसान झाले असेल तर हेक्टरी भरपाईचे निकष लावून त्याप्रमाणे मदत वाटप होते. थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याने खाते क्रमांकाला महत्त्व आहे.

पावसाचे सावट कायम निमगरवी प्रकारची भातशेती कापणीयोग्य झाली आहे. जिल्ह्यात हे क्षेत्र 45 टक्के आहे. दिवसा कडकडीत उन आणि रात्री पाऊस अशी परिस्थिती गेले चार दिवस आहे. रविवारी (ता. 25) सायंकाळी रत्नागिरी तालुक्यात अचानक पावसाला सुरवात झाली. दिवसा कापलेले भात पावसात भिजले होते. भाताच्या उडव्या उन्हासाठी उघड्या ठेवल्यामुळे त्याही भिजून गेल्या. हवामान विभागाकडून 28 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे.